पुणे : महंमदवाडी येथील रहेजा चौक, ट्रिबिका हायस्ट्रीट परिसर तसेच परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये काही समाजकंटकांकडून हातात कोयते व इतर घातक शस्त्रे घेऊन दहशत निर्माण केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असताना अशा घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, "पुणे शहरात गुंडांचा धुमाकूळ सुरू असताना पोलीस प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाई न करता या गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड आम्ही कदापि सहन करणार नाही. जर संबंधितांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर शिवसेना पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही."शिवसेनेने पोलीस आयुक्तांकडे संबंधित गुंडांवर कठोर कायदेशीर कारवाई करून परिसरात कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करण्याची मागणी केली आहे.