पुणे : शिल्पकारांना संघटित करून त्यांच्या कला, व्यवसाय आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘प्रोग्रेसिव्ह स्कल्प्टर्स असोसिएशन’ या राष्ट्रीय शिल्पकार संघटनेचा कार्यविस्तार आता पुण्यात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक सदस्य दीपक थोपटे यांनी दिली.शिल्पकारांसाठी सक्षम, संघटित, व्यावसायिक आणि दूरदृष्टी असलेले व्यासपीठ निर्माण करणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. शिल्पकारांच्या समस्या शासन आणि समाजापुढे प्रभावीपणे मांडणे, त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, प्रदर्शन, संवाद सत्रे आणि कला उपक्रमांचे आयोजन करणे तसेच शासनाच्या विविध योजना आणि संधी शिल्पकारांपर्यंत पोहोचवणे यासाठी संघटना सातत्याने कार्य करणार आहे.
याशिवाय, नवोदित आणि ज्येष्ठ शिल्पकारांमध्ये संवादाचे पूल उभारणे, शिल्पकलेचा सांस्कृतिक वारसा जतन करणे, सार्वजनिक कला प्रकल्पांना चालना देणे, तसेच भारतीय शिल्पकलेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठीही संघटना प्रयत्नशील राहणार आहे.पुण्यातील कार्यविस्तारामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तसेच राज्यातील अधिकाधिक शिल्पकारांना संघटनेशी जोडले जाण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या कला, कौशल्य आणि व्यावसायिक प्रगतीस नवी दिशा मिळेल, असा विश्वास दीपक थोपटे यांनी व्यक्त केला.
दि. १ ऑगस्ट रोजी मुंबई येथील प्रभादेवी येथे आयोजित राज्यस्तरीय बैठकीत राज्यभरातील शिल्पकारांच्या उपस्थितीत कार्यविस्ताराचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला किशोर ठाकुर, सचिन चौधरी प्रदीप शिंदे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील ज्येष्ठ व युवा शिल्पकार उपस्थित होते.संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात स्थानिक समन्वयकांची नियुक्ती करून शिल्पकारांचे व्यापक जाळे उभारण्याचे नियोजन करण्यात येत असून, आगामी काळात सदस्य नोंदणी, कार्यशाळा, परिसंवाद, विद्यार्थी मार्गदर्शन आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही दीपक थोपटे यांनी सांगितले.