पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचललेल्या पिल्लई कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबप्रमुख विनोद पिल्लई यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता, तर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या त्यांची पत्नी शैलेजा (सिरजा) पिल्लई आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई यांनीही रविवारी उपचारादरम्यान प्राण गमावले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून संत तुकाराम नगर पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या घटनेसाठी इतर कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यात स्पष्टपणे लिहिण्यात आले असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, पिल्लई कुटुंब काही वर्षांपूर्वी नेहरूनगर येथील स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होते. मात्र, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते घर विकावे लागले. त्यानंतर ते मोरवाडी परिसरातील भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये विनोद पिल्लई यांनी नोकरी सोडल्यानंतर कुटुंबावरील आर्थिक ताण अधिक वाढला. त्याचबरोबर मूळ गावी सुरू असलेल्या घरबांधणीचा खर्चही त्यांच्या अडचणींमध्ये भर घालत होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दीर्घकाळ मानसिक तणावाखाली असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
पोलिसांच्या तपासात या घटनेचे नियोजन काही आठवड्यांपूर्वीपासून सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. या प्रकरणाशी संबंधित ऑनलाइन खरेदी, मोबाईल फोन आणि इंटरनेट वापराची माहिती तपासली जात असून, त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व पुरावे जप्त करून पुढील तपास सुरू ठेवला आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेले विनोद पिल्लई हे उच्चशिक्षित होते. त्यांनी Indian Institute of Management Ahmedabad मधून शिक्षण घेतले होते. त्यांच्या पत्नी शैलेजा या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांची एकुलती एक मुलगी पौर्णिमा कॉम्प्युटर सायन्सच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. उच्चशिक्षित, करिअरमध्ये स्थिर आणि सामाजिकदृष्ट्या सुस्थितीत दिसणाऱ्या या कुटुंबावर अशी वेळ का आली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे आर्थिक तणाव आणि मानसिक आरोग्य या दोन्ही विषयांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल छडा लावला जात आहे.