पिंपरी-चिंचवड : वाकड-डांगे चौक रस्त्यावरील एका बिर्याणी हाऊसमध्ये रविवारी रात्री गॅस गळतीमुळे भीषण आग लागून १९ वर्षीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले असून काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील सुखवानी सिटी संकुलामधील 'नवी दिल्ली ६ बिर्याणी हाऊस' येथे गॅस सिलिंडर बदलण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. हॉटेलमधील गॅस संपल्याने नवीन सिलिंडर जोडले जात होते. त्याचवेळी शेजारील भट्टी सुरू असल्याने सिलिंडर जोडताना गॅसची गळती झाली आणि आगीचा अचानक भडका उडाला.
या घटनेत शेहजाद शेख (वय १९, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा कर्मचारी आगीच्या धुरात अडकला. धुरामुळे गुदमरल्याने तसेच गंभीर भाजल्याने त्याला तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, सिलिंडर जोडणारा कर्मचारी प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. या आगीत अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे शेजारील बारमधील ग्राहकांमध्ये एकच धावपळ उडाली. स्थानिक व्यावसायिकांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच थेरगाव आणि रहाटणी येथील अग्निशामक दलाचे जवान तीन अग्निशमन बंबांसह घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
प्राथमिक तपासात हॉटेलचे मालक मोहम्मद उस्मान (वय ३८, सध्या तळेगाव, मूळ फरिदाबाद, हरियाणा) यांनी हे हॉटेल फरहान (वय ३५) आणि त्याचा भाऊ शेहजाद शेख यांच्याकडे चालविण्यास दिल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि गॅस गळती कशामुळे झाली, याचा तपास वाकड पोलीस करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.