मुंबई : ठाणे जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात 'मातोश्री'वर आयोजित करण्यात आलेली बैठक वादग्रस्त ठरली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याने बैठकीचे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कळवा आणि कल्याण विधानसभा मतदारसंघांतील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, कल्याणमधील काही पदाधिकाऱ्यांच्या अलीकडील हकालपट्टीच्या मुद्द्यावरून दोन गट आमनेसामने आले. यामुळे बैठकीत मोठी खडाजंगी झाली आणि वरिष्ठ नेत्यांनाही हस्तक्षेप करावा लागला.
बैठकीतील हा प्रकार पाहून उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. पक्षाच्या संघटनात्मक कामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अंतर्गत वाद आणि पदांसाठी सुरू असलेली चढाओढ योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षहिताला प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद या बैठकीत उमटल्याचे सांगितले जात आहे. जुने आणि नव्याने नियुक्त होणारे पदाधिकारी यांच्यातील मतभेद हा वादाचा मुख्य मुद्दा ठरल्याची चर्चा आहे.
या बैठकीला ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या घडामोडीनंतर ठाणे जिल्ह्यातील पक्षातील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे कोणते संघटनात्मक निर्णय घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.