सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द
  • दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 शहर

सूसमधील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; तासन्‌तास अडकून वेळ आणि इंधनाचा अपव्यय

डिजिटल पुणे    05-08-2026 12:40:03

औंध (पुणे) : सूस परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळी परतीच्या गर्दीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहनचालकांना तासन्‌तास कोंडीत अडकून राहावे लागत आहे. त्यामुळे वेळेसह इंधनाचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

सोमवारी सूसहून मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या काही वर्षांत सूस परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी प्रकल्प, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांची वाढ झाली आहे. परिणामी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असली तरी त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन झालेले नाही.

याच पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. भाजप युवा मोर्चा, कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चांदेरे यांनी बावधन वाहतूक पोलिसांकडे निवेदन देत सूसमधील शिवबा चौक आणि तापकीर वस्ती येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे.

वाहतूक कोंडीमुळे अपघातांचा धोका वाढत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ आणि इंधन वाया जात आहे. त्यामुळे संबंधित चौकांमध्ये अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती, अतिक्रमण हटविणे आणि रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, वाहतूक विभागानेही सूस परिसरातील रस्त्यांची मर्यादित रुंदी आणि वाढता वाहनभार ही कोंडीची प्रमुख कारणे असल्याचे नमूद केले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस कर्मचारी तैनात केले जात असले तरी कायमस्वरूपी उपाय म्हणून अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करण्याबाबत महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाला पत्र पाठविण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती