पुणे/दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अखेर नव्या नेतृत्वाची घोषणा करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यातील खामगाव (ता. दौंड) येथील वैशाली नागवडे यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर सुमारे सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदाची धुरा आता नागवडे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या वैशाली नागवडे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. १९९९ मध्ये संगणक डेटा एन्ट्रीच्या कामानिमित्त त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर २००२ मध्ये त्यांची अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाली.
यानंतर त्यांनी महानंदाच्या संचालिका, दौंड पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा तसेच महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षा अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. २०१३ मध्ये त्या महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या, तर त्याच वर्षी उत्तर प्रदेशातील IVRI, बरेली संस्थेच्या संचालकपदीही त्यांची निवड झाली. २०१४ मध्ये NDDB, आनंद (गुजरात) या राष्ट्रीय संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. दोन वर्षांपूर्वी पक्षाने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारीही सोपवली होती.
नियुक्तीनंतर वैशाली नागवडे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिला कार्यकर्त्यांना तळागाळापर्यंत संघटित करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाने दिलेल्या विश्वासाला न्याय देत राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वैशाली नागवडे यांच्या निवडीचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तसेच पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील पदाधिकारी आणि समर्थकांकडून स्वागत होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.