पुणे : पुण्यातील देशातील सर्वात मोठ्या आयटी हबपैकी एक असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये बुधवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी अचानक एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड), स्थानिक पोलीस आणि अमेरिकेच्या विशेष सुरक्षा पथकातील कमांडो मोठ्या ताफ्यासह दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज कमांडो, पोलिसांची वाहने आणि कडक सुरक्षा व्यवस्था पाहून आयटी कंपन्यांमधील कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये काही काळ भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कोणत्याही प्रकारचा दहशतवादी धोका किंवा आपत्कालीन घटना नसून ही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेली उच्चस्तरीय 'मॉक ड्रिल' असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
दुपारी ४ वाजता सुरू झालेला हा विशेष सुरक्षा सराव रात्री ९ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास सुरू होता. या सरावात १०० हून अधिक एनएसजी कमांडोंसह अमेरिकेच्या विशेष सुरक्षा पथकातील १७ कमांडोंनी सहभाग घेतला. हिंजवडी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, हजारो कर्मचारी आणि महत्त्वाच्या आयटी पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला होता.
माण-हिंजवडी परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीच्या परिसरात हा सराव अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडला. संभाव्य दहशतवादी हल्ला, बंधक परिस्थिती, स्फोटकांचा धोका किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात सुरक्षा यंत्रणांनी किती वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद द्यावा, याची चाचणी या मॉक ड्रिलद्वारे घेण्यात आली. यावेळी कमांडोंनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विशेष सुरक्षा उपकरणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध बचाव व कारवाईची प्रात्यक्षिके सादर केली.
या मोहिमेत एनएसजीसह पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक पोलीस प्रशासन आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी समन्वयाने सहभाग घेतला. आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमध्ये प्रभावी संवाद, जलद निर्णय प्रक्रिया आणि 'क्विक रिस्पॉन्स' यंत्रणा किती सक्षम आहे, याचाही आढावा या सरावादरम्यान घेण्यात आला.
सायंकाळच्या वेळेत आयटी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर कमांडो आणि सुरक्षा दल तैनात झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला दहशतवादी कारवाईची शक्यता व्यक्त केली होती. काही काळ परिसरात चर्चांना उधाण आले होते. मात्र, हा केवळ सुरक्षा सज्जतेचा नियमित सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये देश-विदेशातील शेकडो आयटी कंपन्या कार्यरत असून दररोज हजारो कर्मचारी येथे कामासाठी येत असतात. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा सातत्याने आढावा घेणे, संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवणे, या उद्देशाने अशा संयुक्त मॉक ड्रिल वेळोवेळी आयोजित केल्या जात असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.