सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव
  • शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
  • सिंहगड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना : महापौरांचा १५ दिवसांत वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचा आदेश
 शहर

पुण्यात वाहनांसाठी ‘MH 12 1A’ मालिकेचा प्रस्ताव; ‘MH 12’ची ओळख कायम ठेवण्यास केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद

डिजिटल पुणे    06-08-2026 13:00:43

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहराची ओळख बनलेला 'MH 12' हा वाहन नोंदणी कोड कायम ठेवण्याचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे. सध्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) 'MH 12 ZZ' ही शेवटची दोन-अक्षरी मालिका सुरू असून, ती लवकरच संपणार आहे. त्यानंतर कोणती नवीन मालिका सुरू करायची, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओने 'MH 12 1A' अशा स्वरूपातील नवीन मालिकेचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास देशात प्रथमच वाहनांच्या नोंदणी मालिकेत एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर वापरले जाणार आहे. त्यामुळे पुणे हे अशा प्रकारची नवी मालिका वापरणारे देशातील पहिले शहर ठरण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पुण्यातील वाहन नोंदणीसाठी 'MH 61' हा नवीन आरटीओ कोड लागू होण्याची चर्चा सुरू होती. मात्र, 'MH 12' हा केवळ वाहन नोंदणीचा क्रमांक नसून तो पुण्याच्या ओळखीचा भाग बनला आहे. त्यामुळे हा कोड कायम ठेवण्याची मागणी पुणेकरांकडून होत होती.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत पुण्याचा 'MH 12' हा कोड कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली. या मागणीवर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

तीन-अक्षरी मालिका का शक्य नाही?

'MH 12 ZZ' ही मालिका संपल्यानंतर 'AAA' सारखी तीन-अक्षरी मालिका सुरू करण्याचा पर्याय समोर होता. मात्र, त्यामध्ये मोठा तांत्रिक अडथळा आहे. सध्या वाहनांच्या नंबरप्लेटवर राज्य कोड, आरटीओ कोड, मालिका आणि वाहन क्रमांक मिळून एकूण १० अक्षरे किंवा अंक असतात. उदाहरणार्थ, MH 12 ZZ 9999 हा १०-अंकी क्रमांक आहे.

जर MH 12 AAA 9999 अशी तीन-अक्षरी मालिका सुरू केली, तर नंबरप्लेट ११-अंकी होईल. शहरातील चौकांमध्ये बसविण्यात आलेले ANPR (Automatic Number Plate Recognition) कॅमेरे आणि ई-चलन प्रणाली सध्या १०-अंकी नंबरप्लेट वाचण्यासाठीच विकसित करण्यात आली आहे. ११-अंकी नंबरप्लेटमुळे वाहन क्रमांक अचूक ओळखण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने तीन-अक्षरी मालिकेऐवजी एक अंक आणि एक अक्षर असा पर्याय निवडण्यात आला आहे.

वाहनांची वाढती संख्या ठरली कारण

पुण्यात गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे 'MH 12' अंतर्गत असलेल्या दोन-अक्षरी सर्व मालिका जवळपास संपल्या आहेत. विद्यमान नियमांमध्ये अशा परिस्थितीसाठी स्पष्ट तरतूद नसल्याने पुणे आरटीओने '1A' स्वरूपातील नवीन मालिकेचा अभिनव प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला आहे.

लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित

आरटीओ प्रशासनाच्या माहितीनुसार, 'MH 12 ZZ' मालिका संपण्यापूर्वीच केंद्र सरकारकडून या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुण्यातील नवीन वाहनांना 'MH 12 1A' पासून नोंदणी क्रमांक देण्यात येतील. त्यामुळे पुण्याची 'MH 12' ही ऐतिहासिक ओळख कायम राहणार असून, वाहन नोंदणी व्यवस्थेत देशात प्रथमच नवीन स्वरूपाची मालिका सुरू करण्याचा मानही पुण्याला मिळण्याची शक्यता आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती