पुणे : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीच्या वाढदिवसानिमित्त जेलबाहेर फटाकेबाजी करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. आरोपीचे उदात्तीकरण केल्याचा ठपका ठेवत लक्ष्मीनगर पोलिसांनी शंकर भालके याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
माहितीनुसार, येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सुलतान सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ फटाकेबाजी करण्यात आली. या वेळी "हॅपी बर्थडे सुलतान भाई" असा मजकूर असलेला व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या सोशल मीडिया पथकाने त्याची दखल घेत संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले की, व्हिडिओद्वारे आरोपीचे समर्थन आणि उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा प्रकारांना कायद्याने आळा घालण्यासाठी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
या प्रकरणात फटाकेबाजी करणाऱ्या शंकर भालकेला अटक करण्यात आली असून इतर संबंधितांचा सहभाग होता का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. समाजमाध्यमांवर गुन्हेगारांची प्रतिमा उंचावणारे किंवा त्यांचे गौरवीकरण करणारे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.