मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने समोरील मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक माहितीनुसार, फॉर्च्युनरमधील सर्व प्रवासी पिंपरी-चिंचवडमधील वाकड (भूमकर चौक) परिसरातील रहिवासी होते. रात्री दीडच्या सुमारास मिसिंग लिंक बोगद्यातून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. इतर प्रवासी किरकोळ जखमी होत बचावल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे 'देवदूत' पथक आणि आपत्कालीन मदत यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
या दुर्घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली. अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता सुरक्षित केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
प्राथमिक तपासात अतिवेग आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे हे अपघातामागील संभाव्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी महामार्ग पोलीस अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दुर्घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक मार्गावरील हा अपघात पुन्हा एकदा अतिवेगाच्या धोक्याची जाणीव करून देणारा ठरला आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.