सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंक बोगद्यात काळाचा घाला; युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा भीषण अपघातात मृत्यू
 जिल्हा

दहीहंडी उत्सवातील १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण ;अपघाती मृत्यूस १० लाख रुपयांचे कवच

डिजिटल पुणे    07-08-2026 12:24:09

मुंबई : दहीहंडी उत्सवातील गोविंदापथकांना शासनामार्फत विमा संरक्षण देण्यात येते. यावर्षी वाढता प्रतिसाद पाहता गोविंदांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती क्रीडा विभागाने दिली आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये, तर अपघातामुळे रुग्णालयात उपचारासाठी कमाल १ लाख रुपयांपर्यंतचा खर्च देण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने यापूर्वीच दहीहंडीतील मानवी मनोऱ्यांना साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला असून, सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. तसेच अपघातग्रस्त गोविंदांना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधाही उपलब्ध आहे. विमा संरक्षणाचा लाभ १.६० लाख गोविंदांपर्यंत वाढविण्यात आला असून,  प्रति गोविंदा ७५ रुपये किंवा त्यापेक्षा कमी प्रिमियम असलेल्या शासकीय विमा कंपनीची निवड करून विमा योजनेची अंमलबजावणी क्रीडा विभागामार्फत करण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवासाठी सराव करणाऱ्या, वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या आणि प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या गोविंदांची नोंदणी व पडताळणी महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन करणार असून, त्यानुसार विमा हप्त्याची रक्कम अदा करण्यात येईल. या योजनेवरील खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून भागविण्यात येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती