सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंक बोगद्यात काळाचा घाला; युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा भीषण अपघातात मृत्यू
 जिल्हा

पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंक बोगद्यात काळाचा घाला; युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा भीषण अपघातात मृत्यू

डिजिटल पुणे    07-08-2026 15:07:09

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारने समोर असलेल्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारमधील आणखी एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात रात्री सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमधील मिसिंग लिंक बोगद्यात घडला. तुषार भूमकर आपल्या सहकाऱ्यांसह फॉर्च्युनर कारमधून मुंबईकडे जात असताना पुढे धावणाऱ्या मालवाहू टेम्पोला कारची जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील वाहनचालकांनी तातडीने पोलिसांना आणि आपत्कालीन यंत्रणांना माहिती दिली.

धडकेनंतर फॉर्च्युनर कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला, तर टेम्पोही रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळला. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

या अपघातात तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. कारमधील तीन ते चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून सर्वजण पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघातानंतर मिसिंग लिंक बोगद्यातील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे दोन तास बंद ठेवण्यात आली होती. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर आणि रस्ता सुरक्षित केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या काळात महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नेमका अपघात कसा झाला?

प्राथमिक तपासानुसार, भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युनरने पुढे असलेल्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. धडकेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी अतिवेग किंवा चालकाचा अंदाज चुकल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

कोण होते तुषार भूमकर?

तुषार भूमकर हे पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सक्रिय चेहरा म्हणून ओळखले जात होते. युवा काँग्रेसच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. त्यांच्या पत्नीने काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणूकही लढवली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर येताच वाकडसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात शोककळा पसरली. राजकीय, सामाजिक तसेच स्थानिक नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती