मुंबई : नाशिक कुंभमेळ्यातील विकासकामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत कंत्राटे देताना जात, धर्म किंवा भाषा पाहिली जात नसून संबंधित कंपनीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि स्पर्धात्मक निविदा यालाच प्राधान्य दिले जाते, असे स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामांवर टीका करत, "महाराष्ट्रात कंत्राटदार नाहीत का? वरून आदेश येतात आणि त्यानुसार कामे केली जातात," असा सवाल उपस्थित केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गुजरातमधील कंत्राटदारांना विशेष प्राधान्य दिल्याचा दावा चुकीचा आहे. निविदा प्रक्रिया पूर्णपणे स्पर्धात्मक असून कमी दर आणि काम करण्याची क्षमता या निकषांवरच कंत्राटे दिली गेली आहेत. कामांच्या गुणवत्तेसाठी तीन स्तरांवर तपासणी केली जाणार असून गुणवत्ता समाधानकारक आढळल्यानंतरच संबंधित कंत्राटदारांना देयके अदा केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरही स्पष्टीकरण
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत होत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले की, एमएनजीएलकडून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक रस्ते खोदावे लागले आहेत. घरगुती गॅस जोडण्या देण्याचे काम अपेक्षेपेक्षा संथ गतीने सुरू असल्याने रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे. कुंभमेळ्याच्या विविध कामांमुळेही अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून नागरिकांना माहिती मिळावी म्हणून महापालिकेने सूचना फलक लावावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
कर्जमाफीबाबत मोठी माहिती
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण होताच उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीबील (CIBIL) स्कोअरमुळे शेतकऱ्यांना भविष्यात कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट करत, कर्जमाफीमुळे सीबीलवर नकारात्मक परिणाम होईल, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.