पुणे : उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या चाकण MIDC परिसरातील समस्यांनी आता गंभीर वळण घेतले आहे. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, सातत्याची वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमुळे येथील उद्योगांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांना कंटाळून चाकण MIDC मधील तब्बल 20 लघुउद्योगांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC कडे स्थलांतर करण्याची तयारी सुरू केली आहे.
या 20 कंपन्यांनी एकत्र येत संघटना स्थापन केली असून, खंडाळा MIDC मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. या उद्योगांचे स्थलांतर झाल्यास चाकण औद्योगिक परिसराला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या कंपन्यांची एकत्रित उलाढाल सुमारे 1 हजार कोटी रुपये असून, तब्बल 4 हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
वाहतूक कोंडीमुळे उद्योग त्रस्त
चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कामावर ये-जा करताना कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ रस्त्यावरच जात आहे. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
चार हजार कुटुंबांसमोर आर्थिक चिंतेचे सावट
कंपन्या स्थलांतरित झाल्यास हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगारांसमोर मुलांचे शिक्षण, घराचे कर्ज आणि दैनंदिन खर्च भागवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
एका कामगाराने सांगितले की, वाहतूक कोंडीमुळे दररोज ये-जा करण्यासाठी दीड तासापेक्षा अधिक वेळ खर्च होतो. त्यामुळे कामासोबत कुटुंबासाठी वेळ देणेही कठीण झाले आहे. कंपनी स्थलांतरित झाल्यास रोजगारावर परिणाम होण्याची भीती असून, नोकरी गेल्यास कर्जाचे हप्ते भरणे आणि कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
अमोल कोल्हेंचा सरकारवर निशाणा
दरम्यान, चाकण MIDC मधील परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. चाकण MIDC मध्ये खड्डे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून, रस्त्यांसाठी 59 कोटी रुपयांचे टेंडर निघूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
या समस्येबाबत आपण राज्य सरकारला वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 19 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत, या मृत्यूंना जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्योग स्थलांतरित झाल्यास चाकणला मोठा फटका
चाकण MIDC हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा औद्योगिक पट्टा आहे. मोठ्या वाहननिर्मिती कंपन्यांसह अनेक लघु आणि मध्यम उद्योग या परिसरात कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत 20 कंपन्यांनी स्थलांतराची तयारी केल्याने चाकणच्या औद्योगिक विकासासोबतच हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन या समस्यांवर कोणती ठोस पावले उचलते, याकडे उद्योग आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.