बारामती : बारामती शहरात 23 वर्षीय युवतीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी काही तास आधी युवतीने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून, अथर्व नावाचा तरुण तिला काही गोळी देणार असल्याचे सांगितल्याचा दावा तिच्या आईने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत्यूपूर्वी आईला केला फोन
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, 6 ऑगस्ट रोजी युवती अथर्वसोबत बाहेर गेली होती. दिवसभरातील काही वेळ ती आईच्या संपर्कात होती. सायंकाळी आईने तिच्याशी फोनवर संवाद साधला असता, अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार असल्याचे तिने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अथर्वला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असून तो तिला गोळी खाण्यास देणार असल्याचेही तिने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.आईने मुलीला अथर्वच्या घरी न जाण्याचा आणि तातडीने घरी परतण्याचा सल्ला दिला होता.
काही वेळातच प्रकृती बिघडली
रात्रीच्या सुमारास आईने मुलीशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळाने तिच्या मोबाईलवर अथर्वने फोन उचलला आणि युवतीला चक्कर आल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.यानंतर तिला उपचारासाठी बारामतीतील विविध रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. अखेर सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आई रुग्णालयात पोहोचेपर्यंत युवतीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले.
यापूर्वीही गोळ्या दिल्याचा दावा
युवतीच्या मृत्यूपूर्वीच्या काही दिवसांमध्ये ती नेहमीपेक्षा शांत राहत असल्याचे आईच्या निदर्शनास आले होते. याबाबत तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता, अथर्व तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी आग्रह करत असल्याचे तसेच तिला काही गोळ्या देत असल्याचे मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने तक्रारीत केला आहे.मात्र, नेमकी कोणती गोळी किंवा औषध युवतीला देण्यात आले होते का, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दोघांच्या विवाहाबाबतही चर्चा झाली होती
तक्रारीनुसार, युवतीने बी.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. डिसेंबर 2025 मध्ये तिचे अथर्वसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती. पुढे दोन्ही कुटुंबीयांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली होती आणि दोघांच्या विवाहाला कुटुंबीयांची संमती असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.यानंतर दोघेही नियमितपणे भेटत होते तसेच फोनवर संपर्कात होते.
पोलिसांकडून विविध अंगांनी तपास
युवतीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने अथर्व राजेंद्र मेहन याच्यावर संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे करण्यात येत आहे. युवतीला कोणतेही औषध किंवा अन्य पदार्थ देण्यात आला होता का, तिची प्रकृती अचानक का बिघडली आणि त्याचा मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.दरम्यान, युवतीच्या मृत्यूचे निश्चित वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.