सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू; आणखी काही जण ढिगाऱ्याखाली, गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला
  • सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''
 जिल्हा

दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डिजिटल पुणे    12-08-2026 16:41:02

मुंबई : नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी विभागासाठी निश्चित करण्यात आलेले टप्पे व त्यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेली कार्यवाही यासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचना केल्या.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अन्नात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध पितात, बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तोंड द्यावे लागू शकते. भेसळखोर थेट या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारची नरमाई न दाखवता अशा गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावा, असे त्यांनी सांगितले. या भेसळखोरांवर कारवाई करताना  त्यांचेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून त्यांना कायदेशीर पळवाटा मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले.

तसेच, या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्यांच्यावर कारवाई होते, त्यांच्या खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू असताना कोणतीही कायदेशीर त्रुटी उरता कामा नये. यासाठी नामवंत व ज्येष्ठ विधितज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि यासाठी तातडीने एक विशेष लीगल टीम तयार करण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधि व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधि व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती