सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 क्राईम

B.Tech इंजिनिअरचा ‘हायटेक’ कारनामा; बनावट WhatsApp नंबरवर ड्रायव्हरची नोकरी मिळवून 12 लाखांची कार लंपास

डिजिटल पुणे    13-08-2026 11:26:32

मुंबई : तांत्रिक शिक्षणाचा गैरवापर करत चोरीचा अनोखा प्रकार करणाऱ्या 27 वर्षीय बी.टेक शिक्षित तरुणाला मेघवाडी पोलिसांनी पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केली आहे. आरोपीने स्वतःचा मोबाईल नंबर वापरणे टाळत बनावट व्हॉट्सॲप नंबरच्या माध्यमातून कार मालकाशी संपर्क साधला आणि ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळवली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत 12 लाख 45 हजार रुपये किमतीची कार घेऊन तो पसार झाला.

आरोपी निझामी शमसुद्दीन याने पकडले जाण्याची शक्यता टाळण्यासाठी आपली खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. इंटरनेटच्या माध्यमातून तयार केलेल्या बनावट क्रमांकावरून त्याने जिगर घनश्याम पटेल यांच्याशी संपर्क साधला. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने ड्रायव्हरची नोकरी मिळवली.

17 मिनिटांत कार लंपास

22 जून 2026 रोजी सकाळच्या सुमारास अंधेरी पूर्व येथील जिजामाता रोड परिसरातील रामगुरुदेव सोसायटीतून आरोपीने मालकाच्या परवानगीशिवाय मारुती सुझुकी XL6 स्मार्ट हायब्रिड कार घेऊन पलायन केले. कारची किंमत सुमारे 12 लाख 45 हजार रुपये होती. याप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध

आरोपीने डिजिटल माध्यमातून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला असला तरी मेघवाडी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील कोंढवा परिसरात कारवाई करत निझामी शमसुद्दीन याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत त्याने कार चोरीची कबुली दिल्याची माहिती समोर आली. चोरी केलेली कार हैदराबाद येथे लपवून ठेवल्याचेही त्याने सांगितले.

हैदराबादमधून 12.45 लाखांची कार जप्त

आरोपीच्या माहितीवरून पोलिसांचे पथक हैदराबाद येथे पोहोचले. तेथून 12 लाख 45 हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी XL6 कार पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमुळे चोरीच्या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम आणि पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, सहाय्यक फौजदार पवार, पोलीस हवालदार राठोड तसेच पोलीस शिपाई कापसे, खरात आणि कांजर यांनी तपासात सहभाग घेतला.

दरम्यान, आरोपीने तंत्रज्ञानाचा वापर करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे त्याचा हा डाव उधळला गेला. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच चोरीमागील इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती