सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवर राज ठाकरे संतापले; ‘ज्यांना सत्ता दिली, त्यांनाच जाब विचारा’
  • शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
 जिल्हा

मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे – मंत्री प्रकाश आबिटकर

डिजिटल पुणे    14-08-2026 12:52:40

मुंबई : राज्यातील ३० वर्षांवरील सर्व महिला व पुरुषांची मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच गर्भाशय, स्तन आणि मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी, निदान व उपचार करण्यासाठी १ सप्टेंबरपासून १०० दिवसांचे विशेष अभियान मिशन मोडवर राबवावे. ‘३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ असे या अभियानाचे नाव असून, तपासणीसोबतच आजाराचे लवकर निदान करून रुग्णांना वेळीच उपचाराखाली आणण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य भवन येथे अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त (आरोग्य सेवा) संजय काटकर, शहरी आरोग्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे संचालक विजय कंदेवाड तसेच सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक सहभागी झाले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, या अभियानांतर्गत कार्यक्रम प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामीण व शहरी भागातील समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्यामार्फत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आशा, एएनएम व एमपीडब्ल्यू यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे ४० ते ४५ घरांना भेटी देऊन मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाची तपासणी न झालेल्या व्यक्तींची यादी तयार केली जाईल.

गावनिहाय पथके; तपासणीपासून उपचारापर्यंत पाठपुरावा

गावनिहाय पथके तयार करून समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आशा यांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात येईल. ३० वर्षांवरील नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांची तपासणी, आजाराचे लवकर निदान झालेल्या रुग्णांना तातडीने उपचाराखाली आणण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक समुपदेशन व पुढील उपचाराची सुविधा मिळते आहे की नाही, याचाही पाठपुरावा केला जाणार आहे. अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या तपासण्यांचे अहवाल व नोंदी जतन केल्या जाणार असून, अभियानाचे नियमित संनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यात येईल. अभियानाची प्रगती डॅशबोर्डच्या माध्यमातूनही तपासली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापुरातून आरोग्यसेवेचा नवा पायलट प्रकल्प

१५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आरोग्यसेवेचा ‘होप’ हा पायलट प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. शासकीय आरोग्य सुविधा देणाऱ्या रुग्णालयांची माहिती नागरिकांना घरबसल्या उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने तो संपूर्ण राज्यात विस्तारण्यात येईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

याच दिवशी ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमांतर्गत राज्यातील विविध भागांत आरोग्य यंत्रणेच्या बैठका घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. ‘माझा गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या संकल्पनेतून नागरिकांच्या सूचना व तक्रारी जाणून घेऊन त्यांची गांभीर्याने दखल घेतली जाईल.

व्यापक जनजागृतीवर भर

अभियानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर वृत्तपत्रांमधून जाहिराती, पत्रकार परिषदा, ग्रामसभा तसेच विविध प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. या अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास विभाग तसेच अन्य संबंधित विभागांचीही मदत घेतली जाणार आहे, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

केवळ तपासणी करून थांबायचे नाही, तर आजाराचे वेळेत निदान करून रुग्णाला उपचाराखाली आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती