पुणे : नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवल्याच्या कारणातून सुरू झालेल्या वादाचा शेवट थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील ५९ वर्षीय गोविंद उपासे यांचे अपहरण करून त्यांना सांगली जिल्ह्यात नेण्यात आले आणि तेथे त्यांचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
तातोबा उर्फ वैभव अर्जुन केंगार (२८), राहुल राजेंद्र बाबर (२५) आणि रोहन जयसिंग सावंत (२३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या केंगार हा पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मध्यरात्री फोन आला अन् उपासे घराबाहेर पडले
गोविंद उपासे हे ९ ऑगस्ट रोजी रात्री मित्रांसोबत धायरी परिसरात जेवण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते घरी परतले. मात्र, मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर आरोपींचा संपर्क झाला. मित्रांसोबत जाऊन येतो, असे सांगून उपासे दुचाकीवरून घराबाहेर पडले. त्यानंतर ते पुन्हा घरी परतले नाहीत.
वडील बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा मुलगा जयवंत याने ११ ऑगस्ट रोजी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सांगलीत भांडणाची माहिती मिळाल्यानंतर तपासाला वेग
दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी सांगली शहरातील शामरावनगर परिसरातील घोड्याच्या तबेल्याजवळ काही जणांमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातोबा केंगार, राहुल बाबर आणि रोहन सावंत यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी गोविंद उपासे यांचे पुण्यातून अपहरण केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. उपासे यांना मारहाण केल्यानंतर त्यांचा मृतदेह कडेगाव परिसरातील कालव्यात टाकून दिल्याची माहितीही तपासात समोर आली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना मिळाले महत्त्वाचे धागेदोरे
सांगली शहर पोलिसांनी या घटनेची माहिती पुणे पोलिसांना दिल्यानंतर तपासाला वेग आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, उपासे यांना मारहाण करून कारमधून नेण्यात आल्याचे दृश्य पोलिसांच्या हाती लागले. या फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
महिलेच्या मोबाईलवर पाठवलेल्या मेसेजवरून सुरू झालेला वाद, त्यानंतर पुण्यातून अपहरण आणि सांगली जिल्ह्यात झालेला खून या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसही चक्रावले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि अन्य व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.