पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत मोठी आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 2 कोटी 07 लाख 03 हजार 268 मतदारांचे गणना प्रपत्र (Enumeration Form) जमा झालेले नसल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे या मतदारांची नावे आगामी मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख 253 बीएलओंमार्फत घरोघरी जाऊन गणना प्रपत्रे भरून घेण्यात आली. राज्यातील एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदारांपैकी 7 कोटी 71 लाख 50 हजार 584 मतदारांचे प्रपत्र डिजिटाइज करून प्राप्त झाले आहेत. तर 2.07 कोटी प्रपत्रे संकलित होऊ शकलेली नाहीत.
पुण्यात सर्वाधिक 28.69 लाख नावे वगळण्याची शक्यता
पुणे जिल्ह्यात एकूण 90 लाख 80 हजार 173 मतदार असून, त्यापैकी 62 लाख 10 हजार 278 प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे. तर तब्बल 28 लाख 69 हजार 888 प्रपत्रे संकलित न झाल्याची नोंद आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात मतदारांच्या जुन्या आणि सध्याच्या नोंदींमध्ये 7 लाख 25 हजार 49 अॅनोमलीज आढळल्या आहेत. वय, नाव किंवा मॅपिंगमधील तफावत यामुळे अॅनोमली निर्माण होऊ शकते. मात्र, अॅनोमली आढळली म्हणजे संबंधित मतदाराची नोंद चुकीची आहे, असे थेट गृहीत धरले जाणार नाही. संबंधित मतदारांना सुनावणीची संधी दिली जाणार आहे.
याशिवाय 8 लाख 18 हजार 398 मतदार ‘नो लिंकज’ प्रवर्गात आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकूण 15 लाख 43 हजार 447 मतदार सुनावणीच्या प्रक्रियेत येण्याची शक्यता आहे.
२४ ऑगस्टला प्राथमिक मतदारयादी
SIR प्रक्रियेनंतरची प्राथमिक मतदारयादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीबाबत नागरिकांना 23 सप्टेंबरपासून दावे व हरकती दाखल करता येतील. प्राप्त दावे-हरकतींची छाननी आणि सुनावणी पूर्ण केल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पुण्यातील मतदारांनी काय करावे?
पुणे जिल्ह्यातील ASD म्हणजेच Absent, Shifted, Dead आणि Duplicate मतदारांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या यादीत आपले नाव आहे का, याची तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
ASD यादीत नाव आढळल्यास संबंधित मतदाराने नियमानुसार फॉर्म क्रमांक 6 भरून मतदार नोंदणी करावी. पूर्वी अन्य राज्यात मॅपिंग झालेल्या मतदारांसाठी संबंधित ठिकाणी फॉर्म क्रमांक 7, तर केवळ पत्ता बदलासाठी फॉर्म क्रमांक 8 भरता येणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नावे वगळण्याची शक्यता?
पुणे – 28,69,888
ठाणे – 28,61,676
मुंबई उपनगर – 26,64,797
नागपूर – 14,44,257
नाशिक – 10,29,180
मुंबई शहर – 9,51,888
पालघर – 6,69,671
सोलापूर – 6,20,054
SIR मोहिमेमुळे आगामी मतदारयादीत मोठे बदल होण्याची शक्यता असून, त्याचा राजकीय परिणामही होऊ शकतो. मात्र, कोणत्या विधानसभा मतदारसंघावर किती परिणाम होईल, हे अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.