सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 DIGITAL PUNE NEWS

अशोक सराफ खऱ्या अर्थाने मनातील सुपरस्टार; उत्तम कलावंतासोबत उत्तम माणूसही – देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    20-08-2026 10:51:09

नागपूर : ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या ८०व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही कौतुक केले.

अशोक सराफ यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयातून अनेक पिढ्यांना मराठी चित्रपट आणि नाटकांची गोडी लावली. त्यांच्या अभिनयात कृत्रिमता जाणवत नाही. प्रत्येक भूमिका त्यांनी इतक्या सहजतेने साकारली की, पडद्यावरील त्यांच्या पात्रांमध्ये सामान्य मराठी माणसाला स्वतःचे प्रतिबिंब दिसत गेले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठी माणूस हा वास्तवाशी जोडलेला असल्याने अशोक सराफ यांनी साकारलेल्या नायकाच्या भूमिकांमध्ये त्याला स्वतःचे अस्तित्व जाणवले. त्यामुळेच अशोक सराफ हे केवळ लोकप्रिय अभिनेते नसून, खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनातील सुपरस्टार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

हास्यरसाच्या सादरीकरणाची शैली काळानुसार बदलत गेली आणि त्याला नवे आयाम देण्यात अशोक सराफ यांचा मोठा वाटा आहे. ‘हम पाँच’सारख्या हिंदी मालिकांपासून मराठी चित्रपट, नाटक आणि रंगभूमीपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र छाप उमटवली. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी वेगळेपण सिद्ध केले, तर नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केली.“अशोक सराफ केवळ उत्तम कलावंत नाहीत, तर उत्तम माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहता येते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.दरम्यान, सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी आपल्या अभिनय प्रवासातील अनुभव सांगितले. “मला संघर्ष फार कमी करावा लागला. मी काम करत गेलो आणि लोकांना ते आवडत गेले. काय करायचे आणि कुठे थांबायचे, हे कळले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

विनोद सादर करताना मर्यादा आणि नेमकेपणा महत्त्वाचा असतो, असेही अशोक सराफ यांनी नमूद केले. पात्र प्रत्यक्षात उतरवणे ही प्रत्येक वेळी आव्हानात्मक प्रक्रिया असते. अनेक नाटके आणि प्रयोग केल्यानंतरही रंगमंचावर प्रवेश करताना आजही थोडी धास्ती वाटते, अशी मनमोकळी कबुली त्यांनी दिली.

या नागरी सत्कार सोहळ्याला नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती