नागपूर : कोरोना महामारीच्या काळात पती गमावल्यानंतर आयुष्याचा मोठा संघर्ष करणाऱ्या प्रीती आकडे यांच्या आयुष्यात आज नव्या पर्वाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत नागपुरात प्रीती यांचा पुनर्विवाह पार पडला. यावेळी फडणवीस यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देत त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कोरोना काळात अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. सुमारे 300 कुटुंबांना आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी अनेक कुटुंबांना विविध माध्यमातून मदत करण्यात आली.
याच उपक्रमाचा एक भाग असलेल्या प्रीती आकडे यांच्या पुनर्विवाहाची जबाबदारीही पुढे घेण्यात आली. पतीच्या निधनानंतर कठीण परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या प्रीती यांच्या जीवनात आज नव्या नात्याची आणि नव्या आशेची सुरुवात झाली.
‘भावना व्यक्त करण्यासाठी आज माझ्याकडे शब्दच नाहीत’
पुनर्विवाहानंतर प्रीती आकडे भावुक झाल्या. “आज माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. माझे दोन बंधू माझ्या पाठीशी आहेत, याचा मला प्रचंड आनंद आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच या संपूर्ण काळात साथ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांचे त्यांनी आभार मानले.
293 तरुणींच्या मदतीचा घेतला होता निर्णय
माजी आमदार संदीप जोशी यांनी सांगितले की, कोरोना काळात 19 ते 25 वयोगटातील सुमारे 293 तरुणींना दुर्दैवाने मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. या तरुणींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमाला पाठिंबा देत त्यातील सुमारे 100 कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले.
प्रीती यांच्या पुनर्विवाहाच्या माध्यमातून या सामाजिक उपक्रमाला नवी दिशा मिळाल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारा हा विवाहसोहळा नागपुरात चर्चेचा विषय ठरला आहे.