सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 क्राईम

NEETमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरंच, कुटुंबावर शोककळा

डिजिटल पुणे    20-08-2026 12:50:29

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील खंडाळा-भवरबेंद परिसरात NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. सूरज सुभाष शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. NEET परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने तो मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या सूरजच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सूरज हा घरीच राहून NEET परीक्षेची तयारी करत होता. घरातील वरच्या खोलीत तो नियमितपणे अभ्यास करत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, परीक्षेच्या निकालानंतर अपेक्षित यश न मिळाल्याने त्याच्यावर मानसिक दबाव वाढला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कुटुंबीय बाहेर गेले असताना घटना

बुधवारी गावात सप्ताह सुरू असल्याने सूरजचे कुटुंबीय काही वेळासाठी घराबाहेर गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी सूरजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.

यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. त्याची लहान बहीण वरच्या खोलीत गेली असता सूरज गंभीर अवस्थेत आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

चिठ्ठीमुळे कुटुंबीय हादरले

या घटनेनंतर सूरजने मागे ठेवलेल्या एका चिठ्ठीची माहिती समोर आली. या चिठ्ठीत त्याने आई-वडिलांची माफी मागत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याबाबत भावनिक उल्लेख केल्याचे सांगण्यात येत आहे. या चिठ्ठीमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सूरजच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलाचा अवघ्या १९व्या वर्षी झालेला मृत्यू कुटुंबीयांसाठी मोठा आघात ठरला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनीही शोक व्यक्त केला.

वैजापूर पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि इतर सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.NEETसारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अपेक्षित निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे निकाल किंवा अपयशाकडे जीवनाचा शेवट म्हणून न पाहता, विद्यार्थ्यांनी पालक, शिक्षक किंवा विश्वासातील व्यक्तींशी आपल्या भावना आणि अडचणींबाबत मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडेही शिक्षणाइतकेच गांभीर्याने पाहण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती