पुणे : सर रॉनल्ड रॉस यांच्या संशोधनाच्या स्मरणार्थ पाळला जाणारा विश्व मच्छर दिन निमित्त राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NVBDCP) अंतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विशेष व्याख्यान व पथनाट्याचे आयोजन करत निरोगी आरोग्या संदर्भात जनजागृती करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
उपक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली बन्सोड यांनी मलेरिया साठी कारणीभूत डास शोधणारे सर रॉनल्ड रॉस यांच्या संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली. तर प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभुमीवर सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी इंदिरा गांधीं प्रसुतीगृह रुग्णालय सांगवी येथील डॅा. तृप्ती सागळे, डॉ. वैशाली भामरे व डॅा. गणेश जवळकर यांनी आपल्या चमूसह उपस्थित राहत विद्यार्थ्यांना डेंग्यू व मलेरिया रोगासाठी कारणीभूत घटक, सामान्य लक्षणे, जवळच्या सरकारी रुग्णालयात उपलब्ध उपचार सुविधा, संबंधित आजारांच प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर सादरीकरण करून विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याप्रती सजग केले.
व्याख्याना नंतर संदीप राठोड, उद्धव डवारी, धीरज फणसे, सुनील धावरे, अतुल हुमाणे, रोहित सुरवसे, गणेश तरडे, सुशांत साळवे यांनी डेंग्यू व मलेरिया आजारांवर जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. प्रणित पावले यांनी विशेष तांत्रिक सहकार्य केले.