मालेगाव : आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होईल, या भीतीतून प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गजानन निंबाळकर (२४) आणि निकिता संतोष कांबळे (२१) हे दोघे १४ ऑगस्टपासून बेपत्ता होते. दोघे घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मालेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी गोकसावंगी परिसरातील तलावाजवळ मासेमारीसाठी गेलेल्या नागरिकांना दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
महादेव आणि निकिता यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनाही विवाह करण्याची इच्छा होती. मात्र, वेगवेगळ्या जाती असल्याने कुटुंबीयांकडून विवाहाला विरोध होण्याची भीती दोघांना होती, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे.
कुटुंबीयांची समजूत काढूनही विवाहाला मान्यता मिळणार नाही, अशी त्यांची धारणा झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांवर गोकसावंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव पोलीस करत असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार राजेश खेर्डे यांनी दिली.