नागपूर : प्रेमप्रकरणातून दोन तरुणांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्याने नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरात धक्कादायक घटना घडली. सुंदरबन अंडरपासजवळ झालेल्या हाणामारीत गौरव रगडे (वय 27) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गौरव प्रभाकर राऊत आणि दीपक वासनिक या दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव रगडे याचे गेल्या काही काळापासून सुंदरबन परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडे या तरुणीची गौरव राऊतसोबत जवळीक वाढली होती. राऊत हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील असून तो या तरुणीसोबत नरेंद्रनगर परिसरात राहत होता. दोघांनी मिळून क्लाउड किचन सुरू केल्याचीही माहिती समोर आली आहे.
या वाढत्या जवळिकीवरून रगडे आणि राऊत यांच्यात वाद सुरू होता. गुरुवारी हा वाद अधिकच चिघळला. राऊतच्या घरी पार्टी सुरू असताना रगडे तेथे पोहोचला. घराचा दरवाजा न उघडल्याने त्याने खिडकीच्या काचा फोडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर राऊत दुसऱ्या मार्गाने बाहेर पडला आणि रगडेने त्याचा पाठलाग केला.
दोघांचा पाठलाग सुंदरबन अंडरपास परिसरापर्यंत पोहोचला. तेथे दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, हाणामारीदरम्यान रगडेच्या जवळील चाकू राऊतच्या हातात आला. त्यातून झालेल्या हल्ल्यात रगडे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. रगडेचा रक्ताने माखलेला शर्ट आणि घटनेनंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मृत गौरव रगडे याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.प्रेमप्रकरणातून सुरू झालेला वाद थेट प्राणघातक हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नागपूरच्या सुंदरबन परिसरातील ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.