पुणे : नॉटिंगहॅम विद्यापीठ, इंग्लंड येथील रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ. निखिल अजित देशपांडे यांनी पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज, कर्वेनगर येथे विद्यार्थ्यांना एआय आणि रोबोटिक्स क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधनाच्या नव्या दिशा आणि भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.हे व्याख्यान दि.२० ऑगस्ट २०२६ रोजी झाले.डॉ.निखिल अजित देशपांडे यांची प्राध्यापकांशी चर्चा व त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॅालेज, पुणे चे प्राचार्य डॅा.सचिन साखरे,महाविद्यालयाच्या इंटरनॅशनल सेलच्या प्रमुख डॅा. गिरिजा चिद्दरवार हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयोजित विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. देशपांडे यांनी रोबोटिक्स,आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मेकॅट्रॉनिक्स क्षेत्रातील वेगाने होत असलेल्या बदलांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक विषयांवर त्यांच्याशी संवाद साधत प्रश्न विचारले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर, संशोधनाच्या संधी तसेच या क्षेत्रात करिअर घडविताना आवश्यक असलेली कौशल्ये याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना केवळ तंत्रज्ञानाचा वापर करण्यापेक्षा त्यामागील मूलभूत संकल्पना समजून घेऊन संशोधन आणि नवोन्मेषाकडे वळण्याचे आवाहन केले.एआय,रोबोटिक्स आणि मेकॅट्रॉनिक्स या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.अभ्यासक्रमातील बदल, संशोधन, उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रातील वापर तसेच विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना संशोधनाची जोड देण्याबाबत यावेळी चर्चा झाली.अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात देखील विद्यार्थी,प्राध्यापकांशी त्यांनी संवाद साधला.
१८ ऑगस्ट २०२६ रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ॲाफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च,बाणेर रोडरस्ता येथे डॅा निखिल देशपांडे यांनी संस्थेचे अध्यक्ष,संचालक डॅा.अरविंद नातू यांच्यासोबत संस्थेतील विविध विभागात सुरू असलेल्या कामांची माहिती करून घेतली आणि संस्थेत कार्यरत वैज्ञानिकांशी,संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांशी आणि प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली.एआय आणि रोबोटिक्स क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर डॉ.देशपांडे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध उपयोगांची, संशोधनाच्या नव्या दिशांची आणि भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती मिळाली. विशेषतः रोबोटिक्स, एआय आणि मेकॅट्रॉनिक्ससारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाभिमुख कौशल्यांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मूळचे पुण्याचे असलेले डॉ. निखिल देशपांडे हे नॉटिंगहॅम विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागात कार्यरत असून ‘सायबर-फिजिकल हेल्थ अँड असिस्टिव्ह रोबोटिक्स टेक्नॉलॉजीज’ या संशोधन समूहाचे उपप्रमुख आहेत. रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील १७ वर्षांहून अधिक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.डॉ. देशपांडे यांचे संशोधन प्रामुख्याने आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण तंत्रज्ञानावर केंद्रित आहे. शस्त्रक्रियेसाठी सहाय्यक रोबोटिक्स, दूरस्थ रोबोट नियंत्रण, पुनर्वसनासाठी एआय आधारित प्रणाली तसेच विशेष कौशल्यांच्या प्रशिक्षणासाठी रोबोटिक्स आणि मिश्र-वास्तव तंत्रज्ञान या विषयांवर ते संशोधन करतात. रोबोट मॅनिप्युलेशन, यांत्रिक रचना, मशीन लर्निंग आणि संगणकीय दृष्टी या क्षेत्रांतही त्यांचे विशेष प्रावीण्य आहे.डॉ. निखिल देशपांडे यांनी २०१२ मध्ये अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधून रोबोटिक्स विषयात पीएचडी प्राप्त केली. त्यापूर्वी २००३ मध्ये पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी पूर्ण केली.