सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 विश्लेषण

जयपूरमध्ये CJPच्या शाळा पाहणीला ग्रामस्थांचा विरोध; आशुतोष रांकांसह कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की, वाहनांची तोडफोड

डिजिटल पुणे    21-08-2026 12:47:18

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमधील बगरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या दुरवस्थेवरून शुक्रवारी मोठा वाद निर्माण झाला. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)च्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. या वेळी कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की झाल्याचा, तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप CJPकडून करण्यात आला आहे.

CJPचे सह-संयोजक आणि प्रवक्ते आशुतोष रांका हे शाळेची पाहणी करण्यासाठी गावात पोहोचताच ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत त्यांना विरोध केला. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंमध्ये वादावादी व झटापट झाली. CJPच्या आरोपानुसार, रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. काही महिला समर्थकांवर चिखलफेक केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

ग्रामस्थांकडून रस्ता रोखून आंदोलन

घटनेनंतर ग्रामस्थांनी CJPच्या विरोधात शाळेबाहेर आंदोलन केले. ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून मुख्य रस्ता अडवण्यात आला. काही ठिकाणी वाहनांची तपासणीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गावात बाहेरील व्यक्तींना येऊ देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

रांकांचा भाजपवर आरोप

घटनेनंतर आशुतोष रांका यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. गावात विरोध करणारे काही लोक ग्रामस्थ नसून भाजपने आणलेले कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या कार्यकर्त्यांवर आधीच हल्ला करण्यात आल्याचेही रांका यांनी म्हटले. सरकारी शाळेची दुरवस्था दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, सोशल मीडियावरही या घटनेवरून प्रतिक्रिया उमटल्या असून काहींनी हल्ल्यासाठी भाजपशी संबंधित लोकांना जबाबदार धरले आहे. मात्र, या आरोपांबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी समोर आलेली नाही.

जीर्ण शाळेचा प्रश्न ऐरणीवर

रामपुरा-कंवरपुरा येथील सरकारी प्राथमिक शाळेची इमारत अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. १९९९ मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीची अवस्था खराब झाल्याने विद्यार्थ्यांना तेथे शिक्षण देणे धोकादायक बनले. त्यामुळे शाळा जवळच्या दुसऱ्या जागेत हलवण्यात आली असून विद्यार्थी सध्या पत्र्याच्या शेडखाली शिक्षण घेत आहेत.

शाळेच्या परिसरात जनावरांचा चारा, पडलेल्या भिंतींच्या विटा आणि जीर्ण बांधकाम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सध्या दोन शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकवले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

‘सरकारने बांधली नाही तर आम्ही शाळा बांधू’

ग्रामस्थांनी CJPच्या शाळा पाहणीच्या उपक्रमावर आक्षेप घेतला. शाळेच्या प्रश्नाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, असा दावा ग्रामस्थांनी केला. सरकारने काम सुरू केले नाही तर गावकरी स्वतःच्या खर्चाने शाळा उभारतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, या घटनेमुळे रामपुरा-कंवरपुरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सरकारी शाळेच्या दुरवस्थेचा प्रश्न आता राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती