पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात सीओईपी परिसरातील कथित राड्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) करण्यात आलेल्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
सीओईपीमध्ये नेमकं काय घडलं?
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ सीओईपीमधील काही विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर ‘छात्रो की गूंज’शी संबंधित रील्स आणि स्टेटस ठेवले होते. यावरून काही विद्यार्थिनींवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, यासाठी विद्यार्थिनींचे मन वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, सीओईपीच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून तिच्याकडून व्हिडीओ स्टेटमेंट घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अभाविपचे काही कार्यकर्ते वसतिगृहात गेले असताना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचे अभाविपच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून विविध कलमांखाली कारवाई
अभाविपच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या संबंधित कार्यकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(२), १८९(१), १८९(२), १९१(२), ३५१(१), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेसकडून अभाविपवर गंभीर आरोप
या कारवाईनंतर काँग्रेसने अभाविपवर पलटवार केला आहे. सीओईपी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मारहाण तसेच विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवण्याचे आरोप गंभीर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. केवळ राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवल्यामुळे विद्यार्थिनींना धमकावण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
पुणे शहर काँग्रेसचे पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली. अशा प्रकारांना आळा न घातल्यास काँग्रेस आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनीही या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजप-अभाविपवर निशाणा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना वसतिगृहात डांबून ठेवण्याचे आरोप गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
केवळ राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवल्यामुळे विद्यार्थिनींना धमकावण्याचा किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणण्याचा अधिकार अभाविपला कोणी दिला, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. विचारांचा सामना विचारांनी करण्याऐवजी मारहाण आणि धमकीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यात विद्यार्थ्यांनी कोणाचे विचार मांडायचे किंवा सोशल मीडियावर कोणाचे स्टेटस ठेवायचे, हे ठरवण्याचा अधिकार अभाविपने घेतला आहे का, असा सवाल करत या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाआधीच सीओईपी परिसरातील या घटनेमुळे काँग्रेस आणि अभाविप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.