सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका
  • राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक; “धमकावलं, घाबरवलं तरी लढत राहा” — कार्यकर्त्यांना संदेश
  • मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
 शहर

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जय्यत तयारी; ४२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी, १२०० पोलिसांचा बंदोबस्त

डिजिटल पुणे    22-08-2026 11:34:10

पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आरटीओजवळील एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम होणार असून, तब्बल ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

गर्दीचा अंदाज लक्षात घेता पुणे पोलिसांनी कार्यक्रमासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय वाहतूक व्यवस्थेसाठी तब्बल ७०० वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण सुमारे १२०० पोलिसांचा बंदोबस्त कार्यक्रमासाठी असणार आहे.

प्रवेशद्वारापासून वाहनतळापर्यंत पोलिसांची नजर

कार्यक्रमस्थळी येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मुख्य प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी वाढल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमामुळे पुण्यातील वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. गरज भासल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केला जाणार आहे.

विद्यार्थिनी आणि तरुणींशी राहुल गांधी साधणार संवाद

‘छात्रों की गूंज’ हे काँग्रेसच्या देशव्यापी अभियानाचे पुण्यातील चौथे पर्व असल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार आहेत. शिक्षण, बेरोजगारी आणि महिला सुरक्षेसह तरुणाईशी संबंधित विविध प्रश्नांवर ते आपली भूमिका मांडणार आहेत.

लाईव्ह कॉन्सर्टनंतर राहुल गांधींचे भाषण

कार्यक्रमाला सायंकाळी ५ वाजता सुरुवात होणार आहे. सुरुवातीला बॉलीवूड प्लेबॅक सिंगर असिस कौर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. त्यानंतर हिपहॉप आर्टिस्ट सायना आणि ‘टीम डान्सेक्स’कडून सादरीकरण करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर सायंकाळी ६ वाजता राहुल गांधी विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राहुल गांधी यांच्याशिवाय व्यासपीठावर अन्य कोणताही नेता उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

भाषणानंतर थेट प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम

राहुल गांधींच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांसोबत थेट प्रश्नोत्तरांचे सत्र होणार आहे. यावेळी विद्यार्थी त्यांना विविध प्रश्न विचारणार असून, राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पुण्यातील या कार्यक्रमात राहुल गांधी तरुणाईसमोर कोणते मुद्दे मांडतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती