छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे अशी मृतांची नावे आहेत. मोबाईल घेण्यावरून झालेल्या कौटुंबिक वादानंतर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणालला आयफोन १५ घेण्याची इच्छा होती. याच मुद्द्यावरून त्याचा आई-वडिलांशी वाद झाला. त्यानंतर तो सकाळी सुमारे १० वाजता खवड्या डोंगरावर गेला. तो धोकादायक ठिकाणी असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांसह ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
तीन तास सुरू होती कुणालची समजूत काढण्याची धडपड
कुणालला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी जवळपास तीन तास प्रयत्न करण्यात आले. ग्रामस्थ आणि कुटुंबीयांकडून त्याची वारंवार समजूत काढण्यात आली. बचाव पथकाकडूनही त्याला सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तो वारंवार आपली जागा बदलत असल्याने बचावकार्य अधिक कठीण झाले.
दरम्यान, तिसगावचे सरपंचही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुणालला समजावताना, मोबाईल देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कुणालची मानसिक अवस्था अत्यंत अस्वस्थ असल्याचे त्याच्या प्रतिक्रियांवरून दिसून आले.
मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू
कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच परिस्थिती अचानक गंभीर झाली. कुणालने कड्यावरून खाली पडल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला. तेही खाली कोसळले. पती आणि मुलगा खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला.
या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहेत.मोबाईल फोनच्या मागणीवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद इतका टोकाला गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि इतर कारणांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.