पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकारावरून दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत.
विजय वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले प्रश्न मांडू इच्छिणाऱ्या एका विद्यार्थिनीवर दबाव आणण्यात आला. तिला भेटू दिलं नाही, एका खोलीत ठेवण्यात आलं आणि तिच्याकडून पूर्वी दिलेलं वक्तव्य मागे घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित विद्यार्थिनींच्या मुलाखती प्रसारमाध्यमांनी घेतल्या असून त्यातून त्यांची भूमिका स्पष्ट झाली असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.
वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला. “सत्य बोलल्यानंतरही दबावामुळे माफी मागावी लागली, ही परिस्थिती दुर्दैवी आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. संबंधित विद्यार्थिनीला संरक्षण देण्यासाठी आणि तिच्याशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी गेल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सीओईपी परिसरात काँग्रेस आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी लाठीचा वापर केल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. या कारवाईत दोन काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला असून, त्यापैकी एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘पोलिसांवर शासनाचा दबाव’
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला. सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई न करता काँग्रेस कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “लोकशाहीमध्ये बोलण्याचं आणि मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे,” असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या काही तास आधीच सीओईपी परिसरात हा प्रकार घडल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेतील आरोप-प्रत्यारोपांनंतर आता पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.