रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी परिसरात वाशिष्ठी नदीकाठी मगरीने महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या नंदिनी पवार यांच्यावर मगरीने अचानक झडप घातली. मगरीने त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी सोबत असलेल्या अवघ्या 10 वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत धाडसाने आईला मगरीच्या तावडीतून बाहेर काढले.
मगरीने महिलेवर अचानक झडप घेतली
मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी पवार या वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची 10 वर्षांची मुलगी स्वर्णीही होती. नंदिनी कपडे धुण्यात व्यस्त असताना अचानक नदीतील मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने नंदिनी यांना पकडून पाण्याच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला.
आईला वाचवण्यासाठी चिमुकली धावली
आईवर अचानक झालेला हल्ला पाहून स्वर्णी घाबरली नाही. तिने धाडस दाखवत आईचा हात घट्ट पकडला आणि तिला पाण्यापासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला. स्वर्णीच्या या प्रयत्नांमुळे नंदिनी यांची मगरीच्या पकडीतून सुटका झाली. अवघ्या 10 वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार
मगरीच्या हल्ल्यात नंदिनी पवार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर वालोपे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाशिष्ठी नदी परिसरात मगरींचा वावर असल्याने नागरिकांनी नदीकाठी जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि मुलांनी नदीपात्राजवळ एकट्याने जाऊ नये, अशीही खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, आईचा जीव वाचवण्यासाठी स्वर्णीने दाखवलेल्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.