सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
 विश्लेषण

मुलाच्या जन्माचा उत्सव ठरला काळरात्र; भरधाव बस गर्दीत घुसली, १८ जणांना धडक, ५ जणांचा मृत्यू

डिजिटल पुणे    22-08-2026 14:59:10

बेतिया : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथे उत्सवाच्या आनंदावर भीषण अपघाताने विरजण घातले. बेतिया-लौरिया मुख्य मार्गावरील बसवारिया आणि परौतोला दरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव प्रवासी बस रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या गर्दीत घुसली. या दुर्घटनेत १८ जणांना धडक बसली असून पाच जणांचा मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलाच्या जन्मानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार, एनएच-७२७ लगत देवेंद्र दुबे यांच्या कुटुंबीयांकडून आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुलाच्या जन्मानिमित्त घरात उत्साहाचे वातावरण होते. या कार्यक्रमासाठी रस्त्याच्या कडेला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रम पाहण्यासाठी जमा झाले होते.

रात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास गोरखपूरहून बेतियाच्या दिशेने जाणारी शाही प्रवासी बस या मार्गावरून जात होती. त्याचवेळी रस्त्यावर आलेल्या ट्रकला चुकवताना बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. काही क्षणांतच बस थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या गर्दीत घुसली.

अचानक बस घुसल्याने एकच आरडाओरड

भरधाव बस गर्दीत घुसताच घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. काही क्षणांपूर्वी संगीत आणि उत्सवामुळे गजबजलेल्या परिसरात अचानक किंकाळ्या आणि आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले.

अपघाताची माहिती मिळताच लौरिया पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना बेतिया जीएमसीएचमध्ये दाखल केले. मात्र, गंभीर जखमींपैकी काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ट्रकला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याची शक्यता

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बेतियाच्या दिशेने गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक जात होता. बस आणि ट्रक यांच्यात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू असताना बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

संतप्त जमावाकडून वाहनांची तोडफोड

अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी बस आणि ट्रकची तोडफोड केली. तसेच कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या आणि स्पीकरचेही नुकसान करण्यात आले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच नरकटियागंजचे एसडीपीओ जयप्रकाश सिंह घटनास्थळी पोहोचले आणि जमावाला शांत केले.

पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

या भीषण अपघातात संजय महातो, भोला दुबे, बहादूर महातो, देवेंद्र दुबे आणि चांगूर राम यांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य तिघांचा रुग्णालयात नेत असताना किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वेळापूर्वी उत्सवामुळे आनंदाचे वातावरण असलेल्या परिसरात आता नातेवाईकांचा आक्रोश आणि शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघातासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती