मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सीओईपी वसतिगृह परिसरात निर्माण झालेल्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधींचे कार्यक्रम हे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा भाग असल्याचा आरोप करत, कार्यक्रमाआधीच वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी पुण्यातील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसकडून विद्यार्थिनींना राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. तसेच काही प्रभावकांच्या माध्यमातून कार्यक्रमाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या आधीच वाद निर्माण झाल्याने त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, सीओईपी वसतिगृह परिसरात विद्यार्थिनींवर कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप एबीव्हीपीकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे, कार्यक्रमाच्या समर्थनार्थ भूमिका मांडणाऱ्या विद्यार्थिनींना एबीव्हीपी कार्यकर्त्यांकडून धमकावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला सुमारे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. पोलिसांनी आयोजकांना काही अटी व नियम घातले आहेत. पुण्यातील वादाची चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.