सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका
  • राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक; “धमकावलं, घाबरवलं तरी लढत राहा” — कार्यकर्त्यांना संदेश
  • मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
 शहर

राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक; “धमकावलं, घाबरवलं तरी लढत राहा” — कार्यकर्त्यांना संदेश

डिजिटल पुणे    22-08-2026 17:49:30

पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील तरुणाईशी संवाद साधणार असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. पुण्यात दाखल झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांनी विमानतळावर राहुल गांधींचे स्वागत केले.

यानंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेत राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीत पुण्यात काल घडलेल्या विद्यार्थ्यांशी संबंधित घटनेचीही त्यांनी माहिती घेतली. काँग्रेस नेत्यांनी या घटनेबाबत राहुल गांधींना सविस्तर माहिती दिली.

या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना संघर्ष सुरू ठेवण्याचा संदेश दिल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. “तुम्हाला धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न केला जाईल; मात्र तुम्ही लढत राहा,” असा संदेश राहुल गांधींनी दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी कोणताही ‘कानमंत्र’ दिलेला नाही, तर विचार दिले आहेत, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील काही सामाजिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारबाबतही वडेट्टीवार यांनी टीका केली.

काँग्रेसमधील मरगळ दूर झाल्याचा दावा

राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते एकत्र आल्याचे सांगत अपक्ष खासदार व काँग्रेस समर्थक विशाल पाटील यांनी पक्षातील वातावरणाबाबत भाष्य केले. “काँग्रेसमध्ये जी मरगळ असल्याचे बोलले जात होते, ती आता दूर होताना दिसत आहे. आमचे प्रयत्न आता लोकांपर्यंत पोहोचू लागले आहेत,” असे विशाल पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसकडून कार्यक्रमाचे जोरदार प्रमोशन केले जात असताना, भाजपकडून मात्र विद्यार्थ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती