मुंबई : भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या भीषण दुर्घटनेने मुंबई हादरली आहे. २७ फूट उंच गणेशमूर्तीचा तोल जाऊन मूर्ती कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर दुःखाचे सावट पसरले आहे.या संकटाच्या काळात लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भुलेश्वरच्या राजा मंडळाला ११ लाखांची मदत
आगमन मिरवणुकीदरम्यान मूर्तीचे वेल्डिंग तुटल्याने ती अचानक समोरच्या बाजूला झुकली आणि खाली कोसळली. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने मंडळातील कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाला ११ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांनाही प्रत्येकी ५ लाख रुपये मदत दिली जाणार आहे.
एकूण २१ लाखांची मदत
लालबागचा राजा मंडळाकडून या दुर्घटनेतील मदतीसाठी एकूण २१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळासाठी ११ लाख रुपये, तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
ही मदत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी जाहीर केली. दुर्घटनेच्या काळात भुलेश्वरच्या राजा मंडळाच्या पाठीशी उभे राहत लालबागच्या राजाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.