पुणे : ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी (२६ ऑगस्ट) नाना पेठ परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर तसेच जोडरस्ते आणि गल्लीच्या आतील बाजूस १०० मीटरपर्यंत वाहन पार्किंगला बंदी राहणार आहे. मिरवणुकीची स्थिती पाहून आवश्यकतेनुसार वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
नाना पेठेपासून मिरवणुकीला सुरुवात
मिरवणुकीला मनुशाह मस्जिद, नाना पेठ येथून सुरुवात होईल. पुढे संत कबीर चौक, ए.डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलिस चौकी, निशांत सिनेमा, भगवानदास चाळ, चुडामन तालीम, मुफ्ती फौज चौक, सरदार पटेल रस्ता, कुरेशी मस्जिद, जान मोहम्मद स्ट्रीट, बाबाजान दर्गाह, चारबावडी चौकी, फुलवाला गल्ली, सेंटर स्ट्रीट रोड, भोपळे चौक, १५ ऑगस्ट चौक, एम.जी. रोड, महमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, सेंटर स्ट्रीट पोलिस चौकी, सरबतवाला चौक, क्वार्टर गेट, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना सिनेमा, हमजेखान चौक आणि गोविंद हलवाई चौक मार्गे मिरवणूक सुभानशाह दर्गा चौक येथे पोहोचेल. त्यानंतर शुक्रवार पेठेतील सिटी जामा मस्जिद येथे मिरवणुकीची सांगता होईल.
या मार्गांवर वाहतूक वळवली जाणार
मिरवणूक सुरू होताना रास्ता पेठ पॉवर हाऊस ते संत कबीर चौक या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांना समर्थ पोलिस स्टेशन, रास्ता पेठ, पॉवर हाऊस, के.ई.एम. हॉस्पिटल आणि अपोलो थिएटरमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.पद्मजी चौक ते निशांत सिनेमा दरम्यानची वाहतूक कॅम्प हायस्कूलमार्गे वळवण्यात येणार आहे. चुडामन तालीम चौकातून जाणारी वाहने अल्पना मार्ग किंवा जुना मोटार स्टँड मार्गाचा वापर करू शकतील.
एम.जी. रोड, कॅम्प परिसरातही बदल
सरबतवाला चौक, कुरेशी मस्जिद, महावीर चौक, बाबाजान चौक, शिवाजी मार्केट, सेंटर स्ट्रीट आणि एम.जी. रोड परिसरात मिरवणुकीच्या हालचालींनुसार वाहतूक वळवली जाणार आहे. गोविंद हलवाई चौक ते सुभानशाह दर्गा या मार्गावरील वाहनांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
खडकीतील मिरवणुकीसाठीही वाहतूक बदल
खडकी परिसरातील मिरवणुकीसाठी टिळक चौक, डी.आर. गांधी चौक, जुनी महाराष्ट्र बँक चौक आणि पुढे जामा मस्जिद, खडकी बाजार असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मार्गावरही मिरवणुकीच्या वेळेनुसार वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.
पोलिसांचे वाहनचालकांना आवाहन
मिरवणूक मार्गावर दुचाकी, चारचाकी, टेम्पो, हातगाड्या किंवा तत्सम वाहने उभी केल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी मिरवणूक मार्गावर वाहन पार्क करू नये. मिरवणूक पुढे गेल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाल्याची खात्री करूनच त्या मार्गाचा वापर करावा. नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.