सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

MPSC पेपरफुटी प्रकरणाचा तपास कुठवर? 2-3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा संशय; गुणवत्तायादीतील काही उमेदवारही तपासाच्या रडारवर

डिजिटल पुणे    27-08-2026 11:18:13

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. गुन्हे शाखेच्या तपासात परीक्षा होण्याच्या दोन ते तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.22 मार्च रोजी झालेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची माहिती परीक्षेपूर्वीच काही जणांपर्यंत पोहोचल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. दरम्यान, 22 जुलै रोजी जाहीर झालेल्या 488 उमेदवारांच्या अंतरिम गुणवत्ता यादीमुळेही या प्रकरणाला नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

गुणवत्तायादीतील काही उमेदवारांच्या कामगिरीवर प्रश्न

परीक्षेत 200 पैकी 120 गुणांपर्यंत पोहोचणाऱ्या उमेदवारांची संख्या तुलनेने मर्यादित असताना, 120 पेक्षा अधिक गुण मिळवून वरच्या क्रमांकावर आलेल्या काही उमेदवारांच्या मागील स्पर्धा परीक्षांतील कामगिरीचीही तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. काही उमेदवारांची यापूर्वीची कामगिरी तुलनेने सामान्य होती आणि त्यांचे क्रमांक हजारांच्या घरात होते, असा दावा केला जात आहे.त्यामुळे गुणवत्ता यादीतील काही उमेदवार सध्या तपासाच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या उमेदवारांचा पेपरफुटीशी थेट संबंध आहे की नाही, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

‘केवळ एका उमेदवाराला पेपर मिळाला’ या दाव्यावर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात नंदुरबार येथील कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अटक झाल्यानंतर तपासाला आणखी वेग आला आहे. पाटील यांच्या संपर्कातील इतर परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेचा संच देण्यात आला होता का, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.फुटलेली प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर प्रसारित झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा संच केवळ एका परीक्षार्थीपर्यंतच मर्यादित होता, या दाव्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी

प्रवीण पाटील यांच्यासह MPSCचे अटक करण्यात आलेले अवर सचिव अभिजीत लेंडवे, परीक्षेचे समन्वय अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्या बँक खात्यांतील आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या आर्थिक व्यवहारांमधून पेपरफुटी प्रकरणातील संभाव्य आर्थिक देवाणघेवाणीचा काही धागा मिळतो का, याचा तपास केला जात आहे

MPSCकडून पेपरफुटीची कबुली; नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय

औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केले असून, या पदासाठी नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकरणी नंदुरबारमधील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्या अटकेनंतर त्यांनी आणखी किती परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न उपलब्ध करून दिले होते, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

कौटिल्य अकॅडमीची 15 वर्षांची पार्श्वभूमी

पेपरफुटी प्रकरणामुळे नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमी सध्या चर्चेत आली आहे. गेल्या सुमारे 15 वर्षांपासून ही अकॅडमी नंदुरबार शहरात कार्यरत असल्याची माहिती आहे. मोठ्या शहरांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणे शक्य नसलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांना नंदुरबारमध्येच मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने अकॅडमी सुरू करण्यात आल्याचे सांगितले जाते.अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील हे नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचा दावा

कौटिल्य अकॅडमीकडून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केल्याचा दावा केला जातो. नंदुरबारमध्ये MPSC पूर्वतयारीसाठी अभ्यासिका आणि मार्गदर्शन वर्ग सुरू करणाऱ्या सुरुवातीच्या संस्थांमध्ये अकॅडमीचा समावेश असल्याचेही सांगितले जाते.मात्र, सध्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणामुळे अकॅडमी आणि तिचे संचालक चर्चेत आले आहेत. या प्रकरणातील त्यांची नेमकी भूमिका काय होती, प्रश्नपत्रिका किती जणांपर्यंत पोहोचली आणि त्यामागे कोणते आर्थिक व्यवहार झाले का, याची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.

आता तपासाचा केंद्रबिंदू काय?

प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वी किती जणांपर्यंत पोहोचली, ती कोणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली, व्हॉट्सॲपवर ती किती मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आणि गुणवत्ता यादीतील संशयित कामगिरीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, हे तपासातील महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. त्यामुळे MPSC पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढते का, याकडे उमेदवारांचे आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती