मुंबई : सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी सकाळी एका डॉक्टरने टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली. नोकरीवरून काढून टाकल्याच्या नाराजीतून या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याचा जीव वाचवला.
नेमकं काय घडलं?
सकाळी पावणे आठ ते आठच्या सुमारास सायन रेल्वे स्थानक परिसरातील हाय व्होल्टेज टॉवरवर एक व्यक्ती चढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी संबंधित व्यक्तीशी संवाद साधत त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.मात्र, समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्याने टॉवरवर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानक परिसरात उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जवानांची शर्थीची धाव; सीपीआरमुळे वाचला जीव
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अत्यंत सावधगिरीने टॉवरवर पोहोचून त्यांनी संबंधित व्यक्तीला खाली आणले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच जवानांनी तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली.वेळीच मिळालेल्या प्राथमिक वैद्यकीय मदतीमुळे संबंधित व्यक्तीला पुन्हा श्वास घेता आला. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नोकरी गेल्याने टोकाचे पाऊल?
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती फलटण, सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून व्यवसायाने डॉक्टर आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याच्या कारणावरून त्याला संबंधित संस्थेने नोकरीवरून कमी केल्याचे सांगितले जात आहे.
याच कारणामुळे नाराज झालेल्या डॉक्टरने पुन्हा नोकरीवर घेण्याची आणि आपल्यावर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, या घटनेनंतर सायन रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, संपूर्ण घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.