मुंबई : ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळ परिसरात बुधवारी रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परळमधील तकिया मशीद परिसरात दुचाकीस्वारांकडून मोठ्या आवाजात हॉर्न वाजवल्याने स्थानिकांनी आक्षेप घेतला. त्यातून बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्याचदरम्यान भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीवेळी दोन गटांमध्ये झटापट झाल्याचीही घटना घडली. या प्रकारात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
नाकाबंदीवेळी वादाला सुरुवात
पोलिसांकडून डॉ. बी. ए. रोडवरील परळ वर्कशॉपसमोर नाकाबंदी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू होती. मोठ्या आवाजाचे हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात होती. यावेळी सुमारे 50 ते 60 दुचाकीस्वारांनी काही अंतरावर वाहने थांबवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
यानंतर घोषणाबाजी सुरू झाल्याने परिसरातील वातावरण अधिक तणावपूर्ण झाले. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मी कॉटेज परिसरातील सुमारे 30 ते 40 तरुणही रस्त्यावर आले. दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली.
झेंड्यांच्या काठ्यांनी मारहाणीचा आरोप
दोन्ही गटांकडून झेंड्यांच्या काठ्यांचा वापर करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या झटापटीत काही जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांपैकी काही कर्मचारीही जखमी झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
तीन जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी रेहान मसूद सय्यद (19), आदिल खान अहमद खान (19) आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस (18) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय जमावातील इतर अज्ञात व्यक्तींविरोधातही तपास सुरू आहे.
भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान, तकिया मशीद परिसरातील वादानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले. सध्या लालबाग-परळ परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.