उरण : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) अल्फालायनरच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील (H1 २०२६) जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांच्या आढावा अहवालात २०२५ मधील २८ व्या स्थानावरून २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. जेएनपीएने २०२५ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत १३. ६ टक्के वाढ नोंदवली आहे.
गेल्या वर्षभरात कार्यात्मक कार्यक्षमता, जलद मालवाहतूक व निर्गमन, जहाज हाताळणीतील सुधारणा आणि बहुविध वाहतूक जोडणी अधिक सक्षम करण्यावर जेएनपीएने सातत्याने भर दिला आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीसमोर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही जेएनपीएने मालाची अखंडित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना राबवल्या. वाढलेल्या कार्यात्मक गरजांचे सक्षम व्यवस्थापन करत आयात-निर्यात व्यापाराची गती आणि सातत्य कायम ठेवण्यात जेएनपीए यशस्वी ठरले. आव्हानात्मक परिस्थितीतही व्यापार सुरळीत ठेवण्याची जेएनपीएची कार्यक्षमता आणि तत्परता ही जागतिक दर्जाच्या बंदरसेवांच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे द्योतक आहे.
जेएनपीएच्या या जागतिक क्रमवारीतील कामगिरीबाबत बोलताना, गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए म्हणाले, “जेएनपीएने जागतिक क्रमवारीत २१वे स्थान मिळवणे हे आमच्या टर्मिनल ऑपरेटर्स, भागधारक आणि संपूर्ण बंदर समुदायाच्या सामूहिक कार्यक्षमतेचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे जागतिक व्यापारातील वर्षभरातील आव्हानात्मक परिस्थितीतही विश्वासार्ह आणि कार्यक्षम माल हाताळणी सेवा देण्याची जेएनपीएची क्षमता अधिक बळकट झाली आहे. या गतीला पुढे नेत, जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे स्थान आणखी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू."
अल्फालायनर ही लाइनर शिपिंग क्षेत्रातील डेटा व व्यावसायिक माहिती सेवा पुरवणारी आघाडीची जागतिक संस्था असून, ती कंटेनर हाताळणीच्या प्रमाणाच्या आधारे जगातील बंदरांच्या कामगिरीचे मूल्यमापन करते.
या क्रमवारीत झालेली सुधारणा जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे वाढते स्थान अधोरेखित करते, तसेच भारताच्या सागरी व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विकासातील जेएनपीएची वाढती भूमिका स्पष्ट करते.