सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 विश्लेषण

“आज राखीपौर्णिमा… पण तू सोबत नाहीस”; सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या आठवणीत भावूक पोस्ट

डिजिटल पुणे    28-08-2026 11:46:24

पुणे : देशभरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट नात्याचा हा दिवस असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आलेली ही पहिलीच राखीपौर्णिमा असल्याने सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे राजकारणात वेगवेगळ्या भूमिका बजावत असले तरी त्यांच्यातील भाऊ-बहिणीचे नाते कायमच जिव्हाळ्याचे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या राजकीय गटांत गेले. मात्र, राजकीय मतभेदांपलीकडे त्यांच्यातील कौटुंबिक नात्याची चर्चा सातत्याने होत राहिली.

अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर उतरत असताना झालेल्या या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेला सात महिने उलटले असले तरी कुटुंबीयांच्या मनातील ही पोकळी अद्याप कायम आहे.

“आजही वाटतं, तू अचानक येशील…”

राखीपौर्णिमेनिमित्त सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणापासूनच्या आठवणी सांगताना त्यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, भांडणं आणि एकमेकांविषयीचा अभिमान यांचा उल्लेख केला.

“आज राखीपौर्णिमा... पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं... यावर आजही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही”

बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकत्र वाढताना झालेली भांडणं, एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांविषयी असलेला अभिमान हे त्यांच्या नात्याचे आधार होते.आजही अजित पवार अचानक कुठूनतरी येतील, राखी बांधून घेतील आणि बहिणींसोबत गप्पा मारत पुन्हा कुटुंबात रमून जातील, अशी भावना मनात येते, असे त्यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. “तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.राजकीय मतभेदांपलीकडे असलेलं भाऊ-बहिणीचं नातं आणि अजित पवारांच्या आठवणींनी भारावलेली सुप्रिया सुळे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती