काठमांडू : नेपाळमध्ये महापुराने मोठे संकट निर्माण केले असतानाच माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नारायणी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरील सोन्याचे कानातले दोन व्यक्तींनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नेपाळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली आहे.
मृतदेहातून दागिने काढतानाचा व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा सुमारे ४१ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये दोन पुरुष एका महिलेचा मृतदेह पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहेत. यासाठी त्यांनी लाकडाचा आधार घेतला तसेच मृतदेहाचे केस पकडून त्याला पाण्याबाहेर ओढले.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर दोघांनी महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण प्रकाराचे काही जण चित्रीकरण करत होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. आपत्तीच्या काळात मृतदेहाचीही लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली.
व्हिडीओच्या आधारे पोलिसांची कारवाई
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळ पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे तपास सुरू केला. चितवन पोलिसांनी दोन्ही संशयितांची ओळख पटवली. मदन गुरुंग (२५) आणि उमेश चौधरी (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी भरतपूर महानगरपालिका-१ परिसरातील पोखरा बस पार्कजवळून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आपत्तीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लूटमार किंवा अमानुष कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नेपाळमध्ये पुराचा हाहाकार
दरम्यान, नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत मृतांचा आकडा जवळपास ४०० वर पोहोचला असून, १,४०० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर चिखल साचल्याने बचावकार्यही आव्हानात्मक ठरत आहे. या आपत्तीमध्ये काही भारतीय नागरिकही अडकले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.एकीकडे हजारो नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव पथके जीव धोक्यात घालत असताना, दुसरीकडे मृतदेहावरील दागिने लुटल्याच्या या घटनेने नेपाळमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.