पुणे : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठे संकट निर्माण झाले असून, अनेक भारतीय नागरिक या नैसर्गिक आपत्तीत अडकले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमधील पुराच्या परिस्थितीत २८८ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पुण्यातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले चार पर्यटकही या संकटात अडकले आहेत. यातील पूजा भोसले यांनी नेपाळमधील भयावह परिस्थितीची माहिती देत केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.
महापुरामुळे नेपाळमध्ये गंभीर परिस्थिती
नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी भारतीय पर्यटक आणि नागरिक अडकून पडले असून, त्यांच्या सुटकेसाठी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. तामिळनाडूमधील २१ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. त्याचबरोबर तिबेटमध्ये अडकलेल्या सुमारे २०० भारतीय नागरिकांनीही मदतीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
बेपत्ता असलेल्या २८८ भारतीय नागरिकांपैकी ७३ जण त्रिशुली वन जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित कामगार असल्याची माहिती आहे. भारतीय दूतावासाने संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून, बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
‘लवकरात लवकर भारतात आणा’; पुण्याच्या पर्यटकांची सरकारकडे मागणी
कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेल्या पूजा भोसले यांनी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत असून, त्यामुळे पर्यटकांना शक्य तितक्या लवकर भारतात परतण्याचा सल्ला दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“आम्हाला लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत,” अशी मागणी पूजा भोसले यांनी केली आहे. विशेष म्हणजे, ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून त्या यात्रेला गेल्या, त्या कंपनीने संकटाच्या काळात पर्यटकांना योग्य मदत केली नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.त्यामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या पुण्यातील चारही पर्यटकांसह इतर भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
पुराचा धोका कायम; नदीचा प्रवाह अडल्याने नव्या संकटाची शक्यता
दरम्यान, नेपाळमधील महापुराचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. आतापर्यंत या पुरामध्ये ३५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या नव्या परिस्थितीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
भोते कोशी नदीचा प्रवाह काही ठिकाणी अडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा साठलेला पाणीसाठा अचानक फुटल्यास पुन्हा मोठ्या प्रमाणावर जलप्रलय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय छोछेन खोला आणि पुरेपु त्सांग्पो नद्यांच्या संगमाजवळही नदीचा प्रवाह अडल्याने पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनी या संभाव्य धोक्याची माहिती नेपाळच्या संबंधित यंत्रणांना दिली आहे.त्यामुळे पुढील काही दिवस नेपाळसाठी अत्यंत संवेदनशील ठरणार असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.