पुणे : नऱ्हे परिसरातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पुणे महापालिका प्रशासनाने गुरुवारी (२७ ऑगस्ट) मोठी कारवाई केली. धायरी-सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक या मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १२ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
संयुक्त पथकाकडून कारवाई
महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक दोन, अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. रस्ता, पदपथ तसेच इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमध्ये परवानगीशिवाय उभारण्यात आलेली हॉटेल्स, दुकाने, शेड, काउंटर, ओटे आणि कट्टे हटविण्यात आले.
या अनधिकृत बांधकामांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीसह पादचाऱ्यांच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा
नऱ्हे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अतिक्रमणे हटविल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार असून, भविष्यात या भागातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
जेसीबी, ट्रकसह मोठा बंदोबस्त
कारवाईसाठी महापालिकेने दोन ओपन ट्रक आणि दोन जेसीबी तैनात केले होते. तसेच पाच पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे नऊ जवान आणि बिगारी सेवकांची यंत्रणा कारवाईसाठी उपस्थित होती.
या मोहिमेत बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील राठोड, कनिष्ठ अभियंते कुणाल यादव आणि नेहा कोलते, अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड, सहायक निरीक्षक संतोष मेथे, आंबेगाव-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक अतिक्रमण निरीक्षक योगेश कोत्तावड तसेच आकाशचिन्ह विभागाचे शेखर दळवी यांच्या पथकाने सहभाग घेतला.
नागरिकांकडून कारवाईचे स्वागत
महापालिकेच्या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावित जागेवरील उर्वरित अतिक्रमणेही तातडीने हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच हटविण्यात आलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी महापालिकेने नियमित पाहणी करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.दरम्यान, सार्वजनिक रस्ता, पदपथ किंवा इतर सार्वजनिक जागेवर पुन्हा अनधिकृतपणे अतिक्रमण केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.