सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 विश्लेषण

नेपाळमध्ये महापुराचा कहर! तिबेट सीमेजवळ आणखी एक तलाव फुटला; 478 जणांचा मृत्यू, 1,500 हून अधिक बेपत्ता

डिजिटल पुणे    28-08-2026 15:32:41

नेपाळ : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेपाळ-तिबेट सीमेजवळ चोचेन नदी आणि पुरेपु त्सांगपो नदीच्या संगमाजवळ तयार झालेला तलाव फुटला आहे. या घटनेमुळे परिसरातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

चीनने एक दिवस आधीच या तलावाबाबत चिंता व्यक्त केली होती. अखेर तलाव फुटल्यानंतर भोटेकोशी, त्रिशुली आणि नारायणी नदीकाठच्या भागांमध्ये नव्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती लक्षात घेता रसुवा जिल्ह्यातील बचाव आणि मदतकार्य काही काळासाठी थांबवण्यात आले. नागरिक तसेच सुरक्षा यंत्रणांमध्ये तैनात कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नेपाळमध्ये 475 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत 475 जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली असून 977 जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये परदेशी नागरिकांसह नेपाळी लष्कर आणि पोलिस दलातील जवानांचाही समावेश आहे.

दरम्यान, तिबेटमध्येही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. तिबेटमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 558 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेपाळ आणि तिबेटमध्ये मृतांचा एकूण आकडा 478 वर पोहोचला आहे, तर बेपत्ता नागरिकांची संख्या 1,500 हून अधिक झाली आहे.

दुसऱ्या पुराचा धोका; अनेक गावे रिकामी

नवीन तलाव फुटल्याने भोटेकोशी, त्रिशुली आणि नारायणी नद्यांलगतच्या भागांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.चीननेही तिबेटमध्ये संभाव्य दुसऱ्या पुराचा धोका लक्षात घेऊन मदत आणि बचाव कार्य तात्पुरते स्थगित केले आहे. यासोबतच लेव्हल-4 चा इशारा जारी करण्यात आला आहे.

खराब हवामानामुळे बचावकार्याला अडथळे

नेपाळमधील दुर्गम भाग, मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन यामुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. प्रतिनिधी सभेतील विरोधी पक्षनेते भीष्म राज आंगदेम्बे यांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. प्रतिकूल परिस्थिती असूनही नेपाळी लष्कर आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या विविध यंत्रणा समन्वयाने मदत आणि बचावकार्य करत आहेत. दुर्गम भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हवाई मार्गाचाही वापर केला जात आहे.

रसुवा परिसरात हवाई पाहणी

नवीन तलाव फुटल्यानंतर रसुवा आणि भोटेकोशी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हवाई पाहणी करण्याची तयारी सुरू आहे. धुंचे आणि रसुवा येथे आधीपासून तैनात असलेली हेलिकॉप्टर बचाव समन्वय केंद्राच्या माध्यमातून प्रभावित भागांची पाहणी करण्यासाठी पाठवली जाणार आहेत.

दरम्यान, पूरग्रस्त तलावाचा प्रवाह चीनच्या दिशेने सरकत असल्याच्या वृत्तामुळे दोन्ही देशांतील प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील काही तास नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती