सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 जिल्हा

“आता दार उघडून माझा भाऊ येईल…”; मानसरोवर यात्रेला गेलेल्या अभिषेकचा संपर्क तुटला, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची भावासाठी आर्त प्रतीक्षा

डिजिटल पुणे    28-08-2026 17:22:26

कल्याण : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेकडो नागरिकांचा संपर्क तुटल्याची परिस्थिती आहे. नेपाळ तसेच मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील मानसरोवर यात्रेला गेलेल्या काही यात्रेकरूंचा कुटुंबीयांशी संपर्क तुटल्याने नातेवाईकांची चिंता वाढली आहे.

कल्याण पश्चिम येथे राहणाऱ्या २८ वर्षीय अभिषेक घोणे याचा मंगळवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. अभिषेक हा ‘सम्राट टूर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून मानसरोवर यात्रेसाठी गेला होता. मंगळवारी रात्री त्याचा आईशी फोनवर शेवटचा संवाद झाला. यावेळी आगामी प्रवासासाठी निघायचे असल्याचे त्याने आईला सांगितले. मात्र, त्यानंतर अभिषेकशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

अभिषेकचा फोन येत नसल्याने आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, आज रक्षाबंधनाचा सण असल्याने या चिंतेला भावनिक किनार लाभली आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, भावाचा काहीच ठावठिकाणा नसल्याने तिच्या डोळ्यांत अश्रू आहेत.

“दार उघडेल आणि भाऊ घरी येईल…”

रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून हा सण साजरा करत असताना, अभिषेकची बहीण मात्र भावाच्या परतीची वाट पाहत आहे. “आता दार उघडेल आणि माझा भाऊ हसत हसत घरात येईल,” या आशेवर ती दरवाजाकडे डोळे लावून बसली आहे. भावाचा संपर्क तुटल्याने घरातील आनंदाचे वातावरण चिंतेत आणि अश्रूंमध्ये बदलले आहे.

ट्रॅव्हल्स कंपनीकडूनही स्पष्ट माहिती नाही

अभिषेकशी संपर्क तुटल्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप अभिषेकच्या ठावठिकाणाबाबत कुटुंबीयांना समाधानकारक माहिती मिळालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढली आहे.

अभिषेकला सुखरूप परत आणण्याची कुटुंबीयांची मागणी

नेपाळमधील पूरस्थिती आणि संपर्क व्यवस्था विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी अभिषेकच्या कुटुंबीयांनी केली आहे. संबंधित ट्रॅव्हल्स कंपनी, स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासाने समन्वय साधून अभिषेकचा शोध घ्यावा आणि त्याला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी आर्त विनंती कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी आसुसलेल्या बहिणीची नजर आजही घराच्या दरवाजावर खिळली आहे. “भाऊ सुखरूप परत यावा आणि याच हाताने त्याला राखी बांधता यावी,” हीच प्रार्थना सध्या घोणे कुटुंबीय करत आहे.


 Give Feedback



 जाहिराती