मुंबई - कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक आज सकाळी ६ वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकले. त्यांचे काठमांडूहून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य मिळवले आणि सर्व भाविकांचा सागा ते काठमांडू सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला. संकटप्रसंगी तातडीने मदत मिळाल्याबद्दल सर्वांनी मुख्यमंत्री फडणवीस, महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार व्यक्त केले.